www.themaharastratoday.com
फुलंब्री, ता. १५ (प्रतिनिधी): योगेश जाधव
तहसील व महसूल यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे स्वप्नातील घरे स्वप्नातच राहिली
प्रतिनिधी, फुलंब्री
फुलंब्री शहरातील गट क्रमांक 17 च्या फोडणीद्वारे तयार करण्यात आलेल्या 17/1 या गटात बनावट एनए दाखवून सुमारे दीडशे प्लॉटधारकांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात महसूल विभागातील तत्कालीन तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबित केले आहे.
‘हरिओमनगर’मधील बनावट स्वप्नपूर्ती
फुलंब्री-सिल्लोड रोडलगत ‘हरिओमनगर’ या नावाने दीडशेहून अधिक जणांना आकर्षक रहिवासी प्लॉट असल्याचे भासवून विक्री करण्यात आली होती. सात वर्षांपासून बांधकाम परवानगी मिळावी म्हणून प्लॉटधारक नगरपंचायतीच्या वाऱ्या करत आहेत. मात्र एनए ४४ क्रमांक चुकीचा असून संबंधित जागेचे कायदेशीर मूल्यांकनच झालेले नसल्याचे उघड झाल्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या पायाखालची वाळू सरकली.
कायदेशीर लढाईचा सुरुवात
या फसवणुकीविरोधात प्लॉटधारकांनी आंदोलन केले असून संबंधित बिल्डर व डेव्हलपर्सविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमदार अनुराधा चव्हाण यांनी या प्रकरणी विधानसभेत आवाज उठवून बनावट प्लॉट विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. महसूल मंत्र्यांनी यानंतर तातडीने पावले उचलत दोषी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना निलंबित केले.
संपूर्ण साखळीची चौकशी आवश्यक
मात्र केवळ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई करून विषय मिटणार नाही. या संपूर्ण फसवणूक साखळीत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, खाजगी एजंट, दलाल, बनावट एनए विकणारे बिल्डर यांचाही समावेश असून त्यांच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
नागरिकांची आयुष्यभराची पुंजी संकटात
फसवणूक झालेल्या नागरिकांनी आपल्या आयुष्यभराची कमाई या प्लॉट खरेदीसाठी लावली होती. आता या प्लॉट्सचे काय होणार, याबाबत प्रचंड अनिश्चितता आणि मानसिक तणाव नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
सरकारने हस्तक्षेप करून दिलासा द्यावा
या संपूर्ण प्रकरणात फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा, त्यांना प्लॉटबाबत दिलासा देणारा निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन