www.themaharashtratoday.com
मोबाईल नं. 9623871987
दिनांक : 18 फेब्रुवारी 2026
खुलताबाद | प्रतिनिधी : अशोक अधाने
छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)- प्रवास करतांना इंटरनेट वरुन विविध भौगोलिकस्थान माहिती सेवांचा सहयोग प्रवाशांकडून घेतला जातो. अशा सेवांचा सहयोग वाहनचालकांना मोबाईलवरुन अपघातप्रवण स्थळांबाबत पूर्वसुचना देण्याबाबत घ्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, अधीक्षक अभियंता एस.एस.भगत, कार्यकारी अभियंता एस.के. चव्हाण, एस.जी. केंद्रे, श्रीमती प्रिया पुजारी , पोलीस निरीक्षक महामार्ग विभाग गजानन जाधव आदी उपस्थित होते.
सेव्ह लाईफ फाऊडेशन या संस्थेने सन २०२३-२४ मध्येकेलेल्या सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात २०९ अपघातप्रवण स्थळे आहेत. जिल्ह्यात शून्य अपघात अभियान राबविण्याच्या दृष्टिने उपाययोजना राबविणे अपेक्षित असून त्यासाठी अपघातप्रवण स्थळांवरील अपघात प्रवणता निर्मूलन करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी संयुक्त प्रयत्न करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ,महानगरपालिका, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, गृह विभाग, शिक्षण विभाग अशा सर्व विभागांनी संयुक्तपणे उपाययोजना राबवावयाच्या आहेत.
जिल्ह्यात नक्की करण्यात आलेल्या अपघातप्रवण स्थळांचे भौगोलिक अंकन करण्यात आले आहे. त्या अंकनाची माहिती भौगोलिक स्थान माहिती सेवा पुरविणाऱ्या संस्थांना द्यावी. त्यानुसार वाहन चालक वाहन चालवितांना या सेवांचा वापर करेल व रस्त्यात पुढे येणाऱ्या अपघातप्रवण स्थळाबाबत त्यास आगाऊ सुचना मोबाईलद्वारे दिली जाईल. हा संबंधित डाटा अशा संस्थांना देऊन त्या सेवांचा उपयोग अपघात टाळण्यासाठी करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. तसेच आवश्यक स्थापत्य उपाययोजनांबाबत सर्व्हेक्षण करुन त्याचे अंदाजपत्रक द्यावे. त्यात गतिरोधक तयार करणे, फलक लावणे, वाहन चालकाच्या रस्त्यातील दृष्यमानतेतील अडथळे दुर करणे, त्यासाठी रडार व्हेईकल वापरणे, अपघात झाल्यास वैद्यकीय उपचार देण्याचा कालावधी कमी करणे, सर्व संबंधित यंत्रणांचे प्रशिक्षण देणे, जनजागृती करणे इ. उपाययोजना सर्व संबंधित विभागांनी मिळून राबवावयाच्या आहेत,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
More Stories
मुख्याध्यापक बी. डी. जाधव यांचा भव्य सेवापूर्ती गौरव सोहळा
गदाना येथे नृसिंह महाराज पंचमी उत्सवाला उत्साहात सुरुवात
जिल्ह्यात मतदार मॅपिंग ७३.६९% पूर्ण; जनजागृतीला वेग देण्याचे निर्देश