March 5, 2026

 शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त वेरूळ येथे विविध कार्यक्रम

✍️ वार्ताहर: अशोक अधाने
📞 मो. 9623871987

www.themaharashtratoday.com

भव्य दीपोत्सव होणार, महोस्तव समितीचे राजेंद्र पवार यांची माहिती

खुलताबाद (वार्ताहर) –  स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज जयंती महोत्सव २०२५ वार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून यानिमित्त १७ मार्चला सायंकाळी सात वाजता ४  हजार ३१ दिव्यांचा भव्य दीपोत्सव भोसले गढीवर होणार आहे. तर १८ मार्च सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते शहाजीराजे महाराज यांना अभिवादन करण्यात येईल. अशी माहिती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या संदर्भात सोमवारी मालोजीराजे भोसले गढ़ी श्रीक्षेत्र वेरूळ येथे अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीत राजेंद्र पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व अध्यक्षतेखाली नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीचे प्रास्ताविक घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश टोपरे यांनी केले. तर पुंजाजी अण्णा, महेश उबाळे, प्रकाश वाकळे गणेश नाना अधाने, शिवम सोनवणे आदी शिवभक्तांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शहाजीराजे महाराज जयंती मोठ्या संख्येने उत्साहात साजरी करायची आहे, त्यासाठी जी जबाबदारी आमच्यावर येईल ती पार पाडण्यास आम्ही तयार आहोत, जागतिक दर्जाचा विकास या गढीचा होणे गरजेचे आहे. यासाठी भरीव निधीची तरतूद शासनाने करावी आणि येथे शहाजीराजे महाराजांचा तसेच भोसले घराण्याचा इतिहास सांगणारे भव्यदिवे म्युझियम तयार व्हावे असे मत अनेकांनी मांडले.

यावेळी राजेंद्र पवार म्हणाले की, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज जयंती महोत्सव सार्वजनिक सहभागाने साजरा करण्याची सुरुवात केली. या मागचा माझा मूळ हेतू स्वच्छ होता की, ज्या भूमीतून स्वराज्याचे स्पुलिंग पेटवल्या गेले ते महाबली महापराक्रमी शहाजीराजे महाराज यांच्या वास्तव्याने माँसाहेब जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन असलेली ही भूमी भोसले घराण्याचे उगमस्थान आहे, अठरापगड जातीला सोबत घेऊन स्वराज्याची संकल्पना इथूनच उदयास आली, जाती भेद विसरून एकोपा आणि राष्ट्र निर्मितीची संकल्पना मुळातच शहाजीराजे महाराजांची आहे. म्हणूनच या भूमीची शिकवण सर्वांच्या पर्यंत पोहोचवणे हे आपलं सर्वांचं कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. भेदाभेद विरहित क्लेश विरहित राष्ट्रनिर्मितीची महामानवांची संकल्पना पूर्ण होण्यासाठी मालोजीराजे भोसले गढी तथा शहाजीराजे महाराज यांचे विचार समाजापर्यंत पोहोचण्यासाठी हा जयंती महोत्सव जनसामान्यापर्यंत पोहोचवून भोसले गढीवर हा सोहळा लोकोत्सव व्हावा, हीच प्रामाणिक भावना आहे. ज्या ज्या ठिकाणी भोसले घराण्यांचे वास्तव्य झाले, भोसले घराण्यातील ज्या ज्या महापुरुषांच्या समाध्या वास्तव्याचे ठिकाण आहे, तेथे विकास होणे गरजेचे आहे. हेच अंतिम ध्येय आपले असले पाहिजे असे राजेंद्र पवार म्हणाले.

 

यावेळी बैठकीला आलेल्या शिवभक्तांचे आभार परसराम पाटील बारगळ यांनी मानले. याप्रसंगी किशोर काळे, संजय वैद्य, विजय भालेराव, कडुबा सोष्ठे, मदन राठोड, सागर मतकर, परसराम बारगळ, योगेश टोपरे, मोहन गवळी, प्रकाश वाकळे, शुभम सोनवणे, महेश उबाळे, मूलचंद चव्हाण, राजू चव्हाण, विनोद ढीवरे, अरुण गोल्हार, गणेश काजे, अप्पाराव नागे, जनार्दन अधाने, शिवा अंभोरे, संजय श्रीखंडे एकनाथ जाधव, विलास काळे, संदीप मोडके, गणपतराव म्हस्के दयानंद पाटील फुलारे आदींची उपस्थिती होती.

 

यावेळी कार्यकारणीची निवड करण्यात आली. त्यात स्वागत अध्यक्षपदी वेरूळ सरपंच प्रकाश पाटील मिसाळ, उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, कृष्णा पाटील डोणगावकर, संतोष माने, सचिन पवार, गणेश आधाने, परसराम पाटील बारगळ, प्रकाश वाकळे, राजू वरकड, एल. जी. गायकवाड, अनिल श्रीखंडे, महेश उबाळे, अनिल चव्हाण, विशाल खोसरे आदींचा समावेश आहे.

 

१७ मार्चला सायंकाळी ४ हजार ३१ दिव्यांचा भव्य दीपोत्सव, तर १८ मार्च सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते शहाजीराजे महाराज यांना अभिवादन करण्यात येईल. मान्यवरांच्या हस्ते दोन दिवसीय शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उ‌द्घाटन व मार्गदर्शन होणार आहे. अशा भव्य दिव्य स्वरूपात जयंती महोत्सव संपन्न होणार असल्याची माहिती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली.