April 22, 2026

गदाना व भडजी गावच्या गुणवंत विद्यार्थिनींचे सी.ए. परीक्षेत घवघविता यश – ग्रामपंचायतीकडून भव्य सत्कार सोहळा

www.themaharastratoday.com

प्रतिनिधी : अशोक अधाने

दिनांक – ८ जुलै २०२५

गदाना, ता. खुलताबाद – ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी चार्टर्ड अकाउंटंट (C.A.) परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या गावाचा व जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. गदाना येथील कु. ऋतुजा सुनील चव्हाण व भडजी येथील कु. तनुजा भागीनाथ वाकळे यांनी सी.ए. परीक्षेत घवघवित यश संपादन केल्याबद्दल गदाना ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभ ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी सरपंच सौ. सविता पोपट चव्हाण यांच्या हस्ते दोन्ही गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे या यशामागे उभे असलेल्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. कु. ऋतुजा चव्हाण हिचे वडील श्री. सुनील चव्हाण आणि कु. तनुजा वाकळे हिचे वडील श्री. भागीनाथ वाकळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या सत्काराचे स्वागत चेअरमन सुदाम मनोहर चव्हाण यांनी मनपूर्वक केले.

कार्यक्रमास माजी उपसभापती प्रकाश चव्हाण, माजी सभापती सुरेश चव्हाण, उपसरपंच कैलास बडुगे, ग्रामपंचायत सदस्य राजू चव्हाण, जनार्दन वाहुळ, काकासाहेब अधाने, रामहरी तुपे, वैजीनाथ अधाने, दत्तु चव्हाण, सुनिल चव्हाण, सोमिनाथ जाधव, बंडू अधाने, शंकर अधाने, लक्ष्मण अधाने, साहेबराव बडुगे, हिरालाल बडुगे, लवदास अधाने, प्रशांत गदाणकर, मदन ठेंगडे, लक्ष्मण चव्हाण, सुनिल जाधव तसेच परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच सौ. सविता पोपट चव्हाण यांचे मनोगत :

“गावातील मुलींनी सी.ए.सारखी राष्ट्रीय स्तरावरील कठीण परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या कुटुंबाचा, गावाचा आणि समाजाचा गौरव केला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना अभिमान वाटतो. या दोघी तरुणींनी इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.”

ग्रामपंचायत सदस्य राजू चव्हाण यांचे मत :

“सी.ए. सारख्या आव्हानात्मक परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थिनी यशस्वी होतात, हे खरोखरच प्रेरणादायी आहे. आजच्या तरुणाईने यामधून शिकून स्वतःचं करिअर घडवावं.”

माजी उपसभापती प्रकाश चव्हाण यांचे मनोगत :

“या दोघींनी केवळ वैयक्तिक यश मिळवले नाही, तर संपूर्ण समाजासमोर एक नवीन प्रेरणास्रोत म्हणून उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या यशामागे पालकांचा मोलाचा सहभाग असून, समाजाने याचा आदर ठेवावा.”

पत्रकार अशोक अधाने यांचे मत :

“ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी चार्टर्ड अकाउंटंटसारखा अभ्यासक्रम पूर्ण करणे ही मोठी कामगिरी आहे. हे यश या मुलींनी कठोर परिश्रम, समर्पण आणि चिकाटीच्या जोरावर मिळवले आहे. त्यांच्या यशातून संपूर्ण परिसर प्रेरणा घेईल.”

या सोहळ्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थितांनी दोन्ही विद्यार्थिनी व त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.