December 6, 2025

गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात सुरेश सोनवणे यांची निवडणुकीत एन्ट्री

दि.२३ ऑक्टोबर २०२४

प्रतिनिधी : अशोक अधाने ९६२३८७१९८७

गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. गरुड झेप अकॅडमीचे संचालक प्रा. डॉ. सुरेश सोनवणे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आगामी विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 28 ऑक्टोबर 2024 रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

23 ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सोनवणे यांनी त्यांच्या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्यावर विकासाच्या मुद्द्यांवर गंभीर आरोप केले. 15 वर्षे सत्ता असूनही पिण्याचे पाणी, रस्ते, नाल्या आणि कामगारांच्या समस्यांचे समाधान न झाल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “सोन्याची वाटी समजून पितळी वाटी घासत बसलो,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या बंब यांच्यावर टिप्पणी केली.

सोनवणे यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळाल्यास तो स्वीकारण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे तालुक्यात निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांना शह देण्यासाठी मराठवाडा पदवीधर संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासह आता सोनवणेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

खुलताबाद तालुक्याचे भूमिपुत्र असलेले प्रा. सुरेश सोनवणे यांचा राजकीय प्रवास जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरू झाला होता. त्यांनी भाजपमध्ये काम केले, मात्र आता पक्षाच्या विकासविरोधी धोरणांवर असंतोष व्यक्त करत, त्यांनी भाजपचा राजीनामा पत्रकार परिषदेतच सादर केला. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरीची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

सुरेश सोनवणे यांच्या या धाडसी निर्णयामुळे गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात निवडणुकीत रंगत वाढली असून, अपक्ष म्हणून त्यांची उमेदवारी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.