छत्रपती संभाजीनगर | दि.२१ : खुलताबाद तालुक्यात लामनगाव येथे जिल्हा परिषदेची शाळा असून याठिकाणी शाळा खोल्यांचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरु आहे. प्रशासनाचे याकडे कुठलेही लक्ष नाही. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून मनसे ने या शाळांची पाहणी केली असता दोनच व्यक्ती बिगारी व मिस्री काम करत असल्याचे आढळल्याने तेथे कोणताही तांत्रिक कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनसे ने आक्रमक भूमिका घेतली असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व अस्थापना विभागाचे जिल्हा संघटक अशोक पवार पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व अस्थापना विभागाचे जिल्हा संघटक अशोक पवार पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, खुलताबाद तालुक्यात असलेल्या लामनगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी बांधकामाचे साहित्य जसे कि सिमेंट, वाळू, डष्ट, याचे कोणतेही मोजमाप न करता मोठ मोठे डेपो टाकून यात अर्धी गोणी सिमेंट चा वापर करण्यात येत आहे. साईट वर बांधकामाचा नकाशा नाही. व कोणताही तांत्रिक कर्मचारी / अधिकारी साईट वर उपस्थित राहत नाहीत. बांधकाम केलेल्या कामाच्या विटा या हाताने निघत असून कॉलम व बीम यांना किती स्टील वापरायचे याचा नकाशाही या साईट वर नाही. फौंडेशन चे बीम अत्यंत निकृष्ट दर्जाचे भरले आहे. जे पायानेही उकरले असता हे बीम उघडे पडत असून यात कोणतेही स्टील आढळून आले नाही. बांधकामास वापरलेले सिमेंट, वाळू, डष्ट याची गुणवत्ता इतकी वाईट आहे कि नुसत्या राखे प्रमाणे दिसते. तसेच कॉलम भरण्या अगोदर वीट बांधकाम सुरु असून याचे पुरावे हि काढलेल्या फोटो मध्ये दिसत आहे. कॉलम, बीम भरल्या नंतर कामाची गुणवत्ता केली असे वाटत नाही.
शाळेची जुनी इमारत ही डोंगराच्या कडेला असून पावसाळ्यात कधीही डोंगराची दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे. या परिसरात भूस्खलन होऊन मोठी दरड कोसळून मोठी जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. शाळेची पट संख्या १३० असून यामध्ये मुलींची संख्या जास्त असल्याचे आढळले. विद्यार्थ्यांना शौचालय नाही, मुलींना शौचास जाण्यास गंभीर त्रास सहन करावा लागत असून याचे पुरावे फोटो मध्ये दिसून येत आहे. पिण्याच्या पाण्याची हौदाची अवस्था दयनीय असून विद्यार्थ्यांना बोअर चे पाणी प्यावे लागत आहे. यामुळे विद्यार्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारचे हागणदारी मुक्त असे धोरण असतांना विद्यार्थ्यांना उघड्यावर आणि विद्यार्थिनीना शौचालयास आपापल्या घरी जावे लागत आहे. शाळेच्या जुन्या इमारती खचल्या असून पावसाळ्यात स्ल्याब वरून व पत्रावरून पाणी वर्गात पडत असल्याचे पुरावे फोटोमध्ये दिसून येतात. सिलिंग कडे लक्ष गेल्यास पंख्याचे पाते पूर्णतः वाकलेले असून केवळ दिखाव्या पुरते दिसून येतात. शाळेच्या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीच्या नावाखाली थातूर मातुर कामे करून, जुने पत्रे उलटे करून नवीन टाकल्याचे भासवण्यात आलेले दिसते. शाळेच्या मागील बाजूची खिडकी डोंगराच्या दिशेने असून त्या खिडकी पर्यंत पावसाच्या पाण्याने वाहून आलेली दरड, माती जवळपास तीन ते चार फुट म्हणजे खिडकी पर्यंत या दरडी चा भराव वाहून आलेला आहे. याचे पुरावेही काढलेल्या फोटोत दिसतात. दिनांक २५ / ९ /२०२३ रोजी गट शिक्षण अधिकारी, गट साधन केंद्र खुलताबाद यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले असून आज पर्यंत कोणतीही कारवाई प्रशासना मार्फत झालेली नाही. प्रशासन नुसती बघ्याची भूमिका घेतली असून कंत्राटदार आपले काम रात्रदिवस सुरु ठेवून कुणासही जुमानत नाही. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून आपले बिल काढण्याचे उद्योग करत आहे. तरी प्रशासनाने या कामाची गुणवत्ता प्रामाणिकपणे तपासून हे बांधकाम रद्द करून जमिनोद्स्त करावे जेणे करून पुढील होणाऱ्या दुर्घटनेस आळा घालावा. व शाळेसाठी सपाट ठिकाणी शाळेला जागा उपलब्ध करून विद्यार्थांचे भवितव्य सुरक्षित करावे. यावर तातडीने कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करून मनसे स्टाईल ने संबंधिताना सांगत तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व अस्थापना विभागाचे जिल्हा संघटक अशोक पवार पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.हे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील भोकरे साहेब यांना देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर, जिल्हा संघटक रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना मनसे अशोक पवार पाटील, उपजिल्हा संघटक अशोक कराळे पाटील, संदीप आराक, जिल्हा सचिव हेमंत जाधव, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष मुकेश मालोदे पाटील, गंगापूर उपशहर संघटक बाळासाहेब बोजवारे, विभाग संघटक पवन मानकापे पाटील, संदीप हिवाळे, ज्ञानेश्वर धोत्रे,लेहा बाबरा ग्रामसंघतक प्रदीप कापसे पाटील, विठ्ठल बनकर, राजु बनकर, यश बर्वे, ज्ञानेश्वर उकरडे, रवींद्र बनकर आदी उपस्थित होते.
More Stories
राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश..! डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता
ग्रामपंचायत गदाना व ग्रामस्थांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी – एमएसईबी कार्यालयातील अधिकारी गैरहजर, पंचनामा करून तहसीलदारांना अहवाल सादर
खुलताबाद तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025-30 साठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर