November 16, 2025

प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी रोजगार व मानधन वाढीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

🖋️ प्रतिनिधी : अशोक अधाने

www.themaharastratoday.com

मुंबई: 📍 दिनांक: 15 जुलै 2025

मुंबईत आज दिनांक 15 जुलै 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक मा.ना. गिरीशजी महाजन (माजी मंत्री व सध्याचे सरकारमधील मध्यस्थ) आणि लोकनेते मा. बालाजी पाटील चाकूरकर यांच्यामध्ये पार पडली. ही बैठक काल दिनांक 14 जुलै रोजी आझाद मैदान येथे झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती.

मा. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसार, विधानभवनातील दालनामध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली होती. या चर्चेच्या अनुषंगाने, आजची बैठक झाली. या बैठकीत मा. गिरीश महाजन साहेबांनी मा. मुख्यमंत्री महोदयांशी थेट चर्चा करून, प्रशिक्षणार्थ्यांच्या मुख्य मागण्या – कायमस्वरूपी रोजगार व वाढीव मानधन – यावर सकारात्मक चर्चा केली.

मा. महाजन साहेबांनी सांगितले की, “आम्ही मुख्यमंत्री महोदयांची मानसिकता तयार केली आहे. अधिवेशन संपल्यानंतर यासंदर्भात आणखी एक सखोल बैठक घेऊन मार्ग काढला जाईल.”

तसेच, “या मागणीसंदर्भात सरकार सकारात्मक आहे. सुप्रीम कोर्टाचे काही आदेश लक्षात घेऊन त्यानुसार मार्ग कसा काढता येईल, याचा विचार केला जात आहे. तुम्ही निर्धास्त रहा, निश्चितच यातून योग्य तो तोडगा निघेल,” असे आश्वासन मा. गिरीश महाजन साहेबांनी शिष्टमंडळास दिले.

या चर्चेमुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला असून, सरकारकडून योग्य निर्णय होण्याची अपेक्षा बळावली आहे.