November 17, 2025

कपाशीवरील गुलाबी बोंड अळी संदर्भात जागरूक राहून आवश्यकतेनुसार वेळीच व्यवस्थापन करा – राहुल किवसे ( कृषी सहाय्यक ) खुलताबाद 

“कपाशीवरील गुलाबी बोंड अळी संदर्भात जागरूक राहून आवश्यकतेनुसार वेळीच व्यवस्थापन करा” 

दि.२७ ऑगस्ट २०२३

वर निर्देशित संदर्भाप्रमाणे लवकर लागवड केलेल्या म्हणजे साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या कपाशीला पात्या फुल व लहान बोंडे असताना अकोला जिल्ह्यातील तेल्हारा अकोट अकोला यासारख्या तालुक्यातील काही गावामध्ये चीमलेल्या फुलाच्या किंवा डोमकळी सदृश्य अवस्थेत कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. असे चिमलेले कपाशीचे फुल अलगदपणे निघून येते व अशा फुलांमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या अवस्थेची गुलाबी बोंड अळीची अळी अवस्था आढळून येऊ शकते. तेव्हा सर्व भागातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांनी जागरूक राहून वेळोवेळी शेतात निरीक्षणे घेऊन व्हेज गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव ओळखून आवश्यकतेनुसार कपाशीवरील गुलाबी बोंड आळी संदर्भात खालील उपाय योजनांची अंमलबजावणी करावी.
(1) सर्वप्रथम कपाशी शेतामध्ये 40 ते 45 दिवसाचे कपाशीचे पीक असताना कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या सनियंत्रणासाठी हेक्टरी पाच म्हणजेच एकरी दोन कामगंध सापळे गॉसिलूर या काम गंध गोळी सह कपाशीच्या पिकात लावावे व या कामगंध सापळ्यामध्ये सतत दोन ते तीन दिवस सरासरी आठ ते दहा गुलाबी बोंड अळीचे नर पतंग सापळ्यात आढळून आल्यास मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचे पतंग सापळ्यात अडकवून गुलाबी बोंड अळीचे पुढच्या पिढीचे प्रजनन थांबवण्याकरता म्हणजेच मास ट्रॅपिंग हेक्‍टरी 15 ते 20 म्हणजेच एकरी सहा ते आठ कामगंध सापळे कपाशीच्या शेतात लावावे.
(2) कपाशीच्या शेतामध्ये डोमकळ्या म्हणजेच गुलाबाच्या न उमललेल्या कळीप्रमाणे फुले आढळून आल्यास अशा कपाशीच्या शेतामधील डोमकळ्या शोधून अळीसह अशा डोमकळ्यांचा नाश करावा
(3) कपाशीच्या पिकात नत्र युक्त खताचा व संजीवकाचा अतिरिक्त, अवाजवी व अशीफारशीत वापर टाळावा
(4) पिक उगवणीनंतर साधारणता 35 ते 40 दिवसांनी कपाशी पिकात पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरेक्टिन 3000 PPM 40 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन पंधरा दिवसाच्या अंतराने एक किंवा दोन फवारण्या कराव्यात.
(5) पिक उगवणीनंतर पन्नास ते साठ दिवसांनी ट्रायकोग्रामा चीलोणीस किंवा ट्रायकोग्रामा बॅक्टरी या मित्र कीटकाची हेक्टरी 1.5 लाख अंडी प्रती हेक्टर या प्रमाणात दर बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने कपाशी शेतामध्ये पानाच्या मागच्या बाजूने टाचून लावावी.
(6) कपाशीच्या पिकामध्ये फुलांमध्ये पाच टक्क्यापर्यंत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढवून आल्यास क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. जर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पाच ते दहा टक्के च्या दरम्यान आढळून आला तर क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेनोफोस 50 टक्के प्रवाही 30 मिली किंवा Indoxicarb 15.8 प्रवाही 10 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
(7) ज्या ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दहा टक्के च्या वर आढळून आला असेल अशा ठिकाणी Chlorantraniliprole 9.3% + Lambda Cylohathrine 4.6% या मिश्र कीटकनाशकाची 5 मिली किंवा Indoxicarb 14.5% + Acetamapride 7.7 % 10 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची आवश्यकतेनुसार फवारणी करा. धन्यवाद.

टीप : (१) कोणतीही रसायने फवारण्यापूर्वी लेबल क्लेम शिफारशीचा संदर्भ घेऊन लेबल क्लेम शिफारशी प्रमाणेच रसायने फवारणी करावी
(२) रसायने फवारणी करताना सुरक्षित कीडनाशक फवारणी तंत्राचा अंगीकार करावा अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी व प्रमाण पाळावे
(३) रसायने वापरण्यापूर्वी प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य निदान करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणेच वापरणे गरजेचे आहे

पिक सल्ला माहिती संकलन : राहुल किवसे ( कृषी सहाय्यक ) खुलताबाद