www.themaharashtratoday.com
मोबाईल नं. 9623871987
दिनांक : 12 एप्रिल 2026
प्रतिनिधी : अशोक अधाने
गंगापूर : पंचायत समिती गंगापूरच्या सभापती सौ. कविता रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा परिषद प्रशासनाने मंजूर केलेल्या सन 2026-27 च्या मूळ अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्हा परिषद प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यामध्ये तफावत आढळून येत आहे. विशेषतः जमीन महसूल व मुद्रांक शुल्कातून अपेक्षित उत्पन्नाचे अंदाज वास्तवाशी सुसंगत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे अर्थसंकल्पाचा आराखडा “रिअॅलिस्टिक” नसल्याची टीका त्यांनी केली.
तसेच, जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या उत्पन्नातील मोठा हिस्सा पंचायत समित्यांना वितरित होत असताना कमी उत्पन्नाचा अंदाज धरल्याने पंचायत समित्यांच्या अर्थसंकल्पावर विपरीत परिणाम होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विकास कामांवर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शिक्षण विभागातील तरतुदींवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन, अभ्यास सहली तसेच ग्रंथालय निर्मितीसाठी अपुरी तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अधिक निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या पार्श्वभूमीवर, अर्थसंकल्पातील त्रुटींवर चर्चा करून आवश्यक सुधारणा करण्यासाठी तातडीने जिल्हा परिषद विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात यावी, अशी मागणी सभापती सौ. चव्हाण यांनी केली आहे.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देताना पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन