प्रस्तावना:
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो. शिक्षक हा नागरिकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी व देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणारे उत्तम नागरिक घडवण्यासाठी मुलभूत स्वरूपाचे प्रयत्न करत असतो. इतर व्यवसायांमधून निवृत्त झाल्यानंतर व्यक्तींना “माजी” म्हणून संबोधले जाते, तर शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हृदयात चिरंतन “माझे शिक्षक” राहतात. हा फरक आपल्या समाजातील शिक्षकांचे अतुलनीय महत्त्व अधोरेखित करतो. पुढील काळात जगाचे नेतृत्व आजच्या आपल्या विद्यार्थ्यांनी केले पाहिजे त्यासाठी आपल्याला त्यांना सक्षम बनवायचे आहे. आणि त्यांना सक्षम बनवायचे काम हे राज्यातील अनेक गुणवंत, होतकरू व उपक्रमशील शिक्षक सेवाभावी वृत्तीने करत आहेत. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शासनाच्या विविध विभागाद्वारे व स्वयंसेवी संस्थांद्वारे आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. परंतु अनेक मेहनती, होतकरू व उपक्रमशील शिक्षक अशा पुरस्कारांपासून वंचित राहतात व त्यांचे कार्य समाजापर्यंत पोचत नाही. अशा शिक्षकांना ओळखून त्यांचा सन्मान करण्याच्या उदात्त हेतूने या “एस. ए. पी. डीजीटेक राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३” चे आयोजन करण्यात येत आहे.
संपूर्ण राज्यातून प्रस्ताव मागवून “एस. ए. पी. डीजीटेक” च्या तज्ञ शैक्षणिक समिती कडून छाननी करून शिक्षकांच्या गुणवत्ते नुसार व विविध निकषांचा आधार घेऊन राज्यातून एका शिक्षकाची “एस. ए. पी. डीजीटेक राज्य आदर्श शिक्षक” म्हणून निवड करण्यात येईल. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून एका शिक्षकाची “एस. ए. पी. डीजीटेक जिल्हा आदर्श शिक्षक” म्हणून निवड करण्यात येईल. सदर शिक्षक पुरस्कारापासून प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील इतर उपक्रमशील व गुणवत्तावान शिक्षक वंचित राहू नयेत म्हणून तालुकानिहाय “एस. ए. पी. डीजीटेक तालुका आदर्श शिक्षक” पुरस्कारही प्रदान केले जातील. तसेच या पुरस्कारांव्यतिरिक्त उत्तेजनार्थ विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले जातील. व निवडक शाळांना शालेयउपयोगी डिजिटल साहित्य देणगी स्वरुपात देण्यात येईल.
तज्ञ समिती व निवड प्रक्रिया:
“एस. ए. पी. डीजीटेक आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३” साठी प्रस्ताव छाननी व निवडप्रक्रियेसाठी तज्ञ समिती म्हणून एकूण दहा सदस्यांची नेमणूक करण्यात येईल. यात सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी व प्राथमिक / माध्यमिक शाळेतील राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक / मुख्याध्यापक सन्माननीय सदस्य म्हणून समाविष्ट असतील. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील ५ तज्ञ व्यक्ती यांची सदस्य व एस. ए. पी. डीजीटेक मधील १५ कर्मचाऱ्यांची तांत्रिक सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यात येईल. आलेल्या प्रस्तावांची छाननी व पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड हि पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल व सर्व प्रस्तावांचे रेकोर्ड डिजिटल पद्धतीने एक वर्षासाठी राखून ठेवले जाईल. राज्य अथवा केंद्र शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सन्माननीय शिक्षक यांनी कृपया नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करू नयेत. जेणेकरून राज्यातील अशा प्रतिष्ठित पुरस्कारांपासून वंचित राहिलेल्या गुणवत्ताधारक, होतकरू व उपक्रमशील शिक्षकांना एस. ए. पी. डीजीटेक आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ च्या निमित्ताने सन्मान व व्यासपीठ उपलब्ध होईल. राज्य अथवा केंद्र शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सन्माननीय शिक्षक “एस. ए. पी. डीजीटेक आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३” साठी फोन द्वारे अथवा ईमेलद्वारे मार्गदर्शक सूचना करू शकतात.
प्राथमिक स्वरुपात निवड झालेल्या सर्व आदर्श शिक्षकांच्या प्रस्तावातील माहिती व पुरावे सदर शिक्षक ज्या शाळांत कार्यरत असतील त्या शाळांशी संपर्क करून खातरजमा करून घेतली जाईल त्यानंतरच सदर शिक्षकांची अंतिम निवड यादी वेबसाईट वर प्रसिध्द करण्यात येईल. व प्रस्ताव दाखल करणाऱ्या प्रत्येक शिक्षकास पी. डी. एफ. स्वरुपात ईमेल व व्हाट्सॲप द्वारे पाठवण्यात येईल.
पुरस्काराचे स्वरूप:
एस. ए. पी. डीजीटेक राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३: संपूर्ण राज्यातून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून तज्ञ समितीमार्फत एका शिक्षकाची निवड हि “एस. ए. पी. डीजीटेक राज्य आदर्श शिक्षक” म्हणून केली जाईल. सदर शिक्षकास मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात येईल. विद्यादानाचे कार्य करत असतांना बदलत्या तंत्रज्ञानाचा लाभ शिक्षक व विद्यार्थी यांना मिळावा म्हणून एस. ए. पी. डीजीटेक राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ प्राप्त शिक्षकास नावाजलेल्या कंपनीचा हाय कॉन्फ्युगरेशन लॅपटॉप भेटवस्तू म्हणून देण्यात येईल.
एस. ए. पी. डीजीटेक जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३: जिल्हा निहाय प्रस्तावांची वर्गवारी करून तज्ञ समितीमार्फत प्रत्येक जिल्हानिहाय एका शिक्षकाची निवड हि “एस. ए. पी. डीजीटेक जिल्हा आदर्श शिक्षक २०२३” म्हणून केली जाईल. सदर शिक्षकास मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात येईल. तसेच या शिक्षकांनाही एस. ए. पी. डीजीटेक नावाजलेल्या कंपनीचा हाय कॉन्फ्युगरेशन टॅब भेटवस्तू म्हणून देण्यात येईल. राज्यातून अशा ३६ शिक्षकांची निवड “एस. ए. पी. डीजीटेक जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३” साठी करण्यात येईल.
तालुकानिहाय एस. ए. पी. डीजीटेक जिल्हा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३: एस. ए. पी. डीजीटेक पुरस्कारापासून तळागाळातील कोणताही गुणवत्तावान , होतकरू व उपक्रमशील शिक्षक वंचित राहू नये म्हणून राज्यातून एक व राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एक असे ३६ असे एकूण ३७ शिक्षकांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उरलेल्या प्रस्तावांची तालुका निहाय छाननी करून प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड “एस. ए. पी. डीजीटेक तालुका आदर्श शिक्षक” म्हणून करण्यात येईल. सदर शिक्षकासहि वरीलप्रमाणेच शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल.
निवडक शाळांसाठी देणगी स्वरुपात एल. ई. डी. स्क्रीन: शासनाचे व स्वयंसेवी संस्थांचे आटोकाट प्रयत्न सुरु असूनही बदलत्या तंत्रज्ञानाचा फायदा राज्यातील प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणे अजूनही शक्य झालेले नाही. एस. ए. पी. डीजीटेक आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ च्या माध्यमातून प्रस्ताव दाखल करण्याऱ्या शिक्षकांसोबत होणाऱ्या संवादातून राज्यातील अनेक शाळांबाबत प्राथमिक माहिती मिळणे अपेक्षित आहे. तज्ञ समितीमार्फत राज्यातील निवडक शाळांना एस. ए. पी. डीजीटेक आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ च्या मंचावरून एल. ई. डी. स्क्रीन भेट म्हणून देण्यात येईल.
पुरस्कार सोहळा:
निवड झालेल्या पुरस्कार्थींचा व पुरस्कारासाठी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी “एस. ए. पी. डीजीटेक आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३” पुरस्कार प्रदान सोहळा हा भव्यदिव्य अशा सभागृहात आयोजित करण्याचा एस. ए. पी. डीजीटेक चा मानस आहे. राज्यातील पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांना व शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांना सोयीस्कर होईल या उद्देशाने विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरी पुणे येथे डिसेंबर च्या शेवटच्या
आठवड्यात पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या पुरस्कारार्थींना फोन, ईमेल व व्हाट्सॲप द्वारे पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण पत्र सोहळ्याच्या तारखेच्या १० दिवस आधी कळवण्यात येईल. पुरस्कार स्वीकार करण्यासाठी राज्य पुरस्कार प्राप्त एक पुरस्कारार्थीं आपल्या सोबत मित्र, नातेवाईक किंवा परिवारातील जास्तीत जास्त ५ सदस्यांना आमंत्रित करू शकतात. जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक आपल्या सोबत जास्तीत जास्त ३ सदस्यांना आमंत्रित करू शकतात व तालुका पुरस्कार प्राप्त व उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त शिक्षक जास्तीत १ सदस्याला आमंत्रित करू शकतात. पुरस्कार सोहळ्यासाठी शिक्षकांना स्वखर्चाने पुरस्कारस्थळी उपस्थित राहावे लागेल. पुरस्कार सोहळ्याच्या दिवशी पुरस्कार स्थळी उपस्थित पुरस्कार्थी व त्यांच्या सोबत आलेले मित्रपरिवार यांच्या चहापानाची सोय एस. ए. पी. डीजीटेक मार्फत करण्यात येईल.
शिक्षकांची अंतिम निवड करतांना शिक्षकांचा शैक्षणिक, सामाजिक दर्जा, तसेच सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण याबाबत संवेदनशीलता व त्यासाठी केलेले विशेष प्रयत्न राष्ट्रीय दृष्टीकोनाबाबत विचार, कार्य व उपक्रम निवड समिती विचारात घेईल व त्यासाठी अतिरिक्त विशेष गुणदान केले जाईल. प्रत्येक नामांकन करणाऱ्या शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी लागणारा दृष्टीकोन आवर्जून मांडावा त्याचाही विचार समितीद्वारे बारकाईने केला जाईल. त्यामुळे वरील निकषांव्यतिरिक्त शिक्षकांचे जे जे अतिरिक्त योगदान असेल त्याची पुराव्यासहित माहिती प्रस्तावात नमूद करावी.
खालील मुद्देही अतिरिक्त गुणदानासाठी विचारात घेतले जातील.
शिक्षकांनी स्वतःची कौशल्ये सुधारण्यासाठी वैयक्तिकरित्या केलेले इतर कोणतेही प्रयत्न.
आनंददायी शिक्षणासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर.
विद्यार्थ्यांवर अध्यापनाचा अधिक चांगला परिणाम व्हावा यासाठी शिक्षकाने अवलंबलेल्या सर्जनशील पद्धती इत्यादी उदा. कथा-कथन, कला, खेळ, उदाहरणे इ.
शिकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी वर्गात अध्यापन पद्धती सुधारण्याच्या प्रक्रियेत विषयाचा वास्तविक जीवनातील परिस्थितीशी संबंध जोडणे, खुल्या चर्चेला प्रोत्साहन देणे.
इतर शिक्षकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करणे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्गाच्या भिंतींच्या पलीकडे जाऊन मार्गदर्शन करणे.
पोषण, स्वच्छतागृह, मासिक पाळी स्वच्छता, बालविवाह, वंचित मुलांचे उत्थान इत्यादी सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयांबाबत मुलांमध्ये सामाजिक जागरूकता पसरवण्यासाठी शिक्षकांनी केलेले कार्य.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन