February 9, 2026

सिद्धार्थ महाविद्यालयात छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी : अशोक अधाने

पडेगाव – दि.२६ जून २०२५ |  सिद्धार्थ ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालयात छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रवीण कुमार व डॉ. ज्योती बासू यांची उपस्थिती लाभली होती. संस्थेचे संचालक प्रा. सुनील मगरे व इंजी. साहिल मगरे यांचीही विशेष उपस्थिती होती.

या कार्यक्रमात डॉ. प्रवीण कुमार यांनी शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक, कृषी व सहकार क्षेत्रातील योगदानावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शाहू महाराजांनी शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा मूलभूत आधार आहे हे ओळखून अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले.

प्रा. सुनील मगरे यांनी भाषणात सांगितले की, राजश्री शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक होते. त्यांनी गुन्हेगारी जमातींवरील कलंक दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणले. सक्तीचे शिक्षण लागू करून शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यांपर्यंत पोहचवली. विधवा पुनर्विवाह, अंतर्जातीय विवाह, सहकार तत्त्व, जनहितार्थ कायदे अशा अनेक सुधारणांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक न्याय रुजवला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मनोहर वानखेडे यांनी शाहू महाराजांचा जीवनप्रवास उलगडून दाखवला. त्यांनी सांगितले की, १६ जून १८७४ रोजी कागल (घाडगे घराणे) येथे जन्मलेल्या यशवंत यांना पुढे आनंदीबाई यांनी दत्तक घेतले आणि त्यांचे नाव शाहू ठेवण्यात आले. ते कोल्हापूर संस्थानचे छत्रपती झाले आणि सामाजिक परिवर्तनाचे महान कार्य हाती घेतले. शिक्षण, कृषी, उद्योग, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी लोककल्याणकारी निर्णय घेतले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. कुलदीप जाधव यांनी केले. आभार प्रा. सुनील बत्तीशे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. दीपक पाईकराव, डॉ. मिलिंद आठवले, प्रा. विनोद अंभोरे, डॉ. शेख खालेद, प्रा. रोहिणी देवकाते यांच्यासह इतर शिक्षक व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रम संस्मरणीय केला.