November 16, 2025

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 वरील काटशेवरी फाटा येथे अतिक्रमण हटविण्यासाठी मोजमाप कार्य सुरू – नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

🖋️ प्रतिनिधी : अशोक अधाने

www.themaharastratoday.com

खुलताबाद : 📍 दिनांक – १४ जुलै २०२५ 

खुलताबाद, ता. १४ जुलै २०२५ –
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 वरील काटशेवरी फाटा परिसरात अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आजपासून काटशेवरी फाटा येथे अतिक्रमण मोजमापाचे काम अधिकृतरित्या सुरू करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गालगत दोन्ही बाजूंनी ५० फूट पर्यंत अतिक्रमणे हटविण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त सहभागातून मोजमाप सुरू करण्यात आले आहे.

या कारवाईविषयी स्थानिक नागरिकांमध्ये संमिश्र भावना आढळून येत आहेत. काही नागरिकांनी आपल्या घर, दुकान, ऑफिस यांचे बांधकाम अतिक्रमणात जाईल, या भीतीने नाराजी व्यक्त केली आहे. तर काही ठिकाणी नागरिकांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करत, अतिक्रमण निघाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल व अपघातांची शक्यता कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, मोजमाप पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार कारवाई करून अतिक्रमणे हटवली जातील. तसेच, ही कारवाई रस्ते सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

नागरिकांनी या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

— वार्ताहर
अशोक अधाने

मो.9623871987
www.themaharashtratoday.com