November 15, 2025

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रांना अचानक भेट

✍️ वार्ताहर: अशोक अधाने
📞 मो. 9623871987

www.themaharashtratoday.com

बाजार सावंगी (वार्ताहर) – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दुपारी दीड वाजता खुलताबाद आणि फुलंब्री तालुक्यातील बारावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यांनी स्वामी विवेकानंद महाविद्यालय, समर्थ महाविद्यालय, ताजनापूर शांताराई महाविद्यालय (खुलताबाद) आणि शेलगाव (फुलंब्री) येथील परीक्षा केंद्रांवर जाऊन व्यवस्थेची तपासणी केली. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक वर्गात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थितीही तपासली. केंद्रप्रमुख व शिक्षकांशी संवाद साधत त्यांनी योग्य सूचना दिल्या.

गैरप्रकार करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल होणार

परीक्षेतील गैरप्रकारांना सहकार्य करणाऱ्यांविरोधात तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश मीना यांनी दिले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी परीक्षा प्रक्रिया पारदर्शक असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यंदा कठोर पावले उचलली आहेत.

कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी

राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत भरारी पथके आणि बैठे पथके नियुक्त करण्यात आली असून, ते नियमितपणे परीक्षा केंद्रांची तपासणी करत आहेत.

जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अचानक भेटी देण्यात येणार असून, कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही मीना यांनी स्पष्ट केले. परीक्षेच्या काळात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनाची सतत नजर राहणार आहे.