February 8, 2026

बारामती विमानतळावर पाच किमी दृष्यमानता असेल तरच विमान उतरवायची परवानगी होती

www.themaharashtratoday.com

मोबाईल नं. 9623871987

📅 दिनांक : 31 जानेवारी 2026

 प्रतिनिधी : अशोक अधाने

मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, प्राथमिक तपासात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारामती विमानतळावरील लँडिंगच्या नियमांकडे झालेले दुर्लक्ष आणि तिथल्या तांत्रिक मर्यादा या भीषण अपघाताला कारणीभूत ठरल्याचे संकेत मिळत आहेत.
बारामती विमानतळ हे प्रामुख्याने पायलट ट्रेनिंगसाठी वापरले जाते. या विमानतळाच्या धावपट्टीला (रनवे ११ आणि २९ उलट – सुलट बाजुने) तांत्रिक भाषेत ‘व्हिज्युअल अप्रोच’ धावपट्टी म्हटले जाते. नियमानुसार, अशा धावपट्टीवर विमान उतरवण्यासाठी किमान ५ किलोमीटर दृश्यमानता असणे अनिवार्य आहे. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी बारामतीमध्ये दृश्यमानता केवळ ३ किलोमीटर (३००० मीटर) होती. म्हणजेच, तांत्रिकदृष्ट्या हे विमान तिथे उतरवणे अत्यंत धोकादायक होते.

VFR विरूद्ध IFR: नेमकं कुठे चुकलं ?
विमान वाहतुकीत लँडिंगचे दोन मुख्य प्रकार असतात पहिला Visual Flight Rules जिथे पायलट स्वतःच्या डोळ्यांनी धावपट्टी पाहून लँडिंग करतो. यासाठी ५ किमी व्हिजिबिलिटी लागते. तर दुसरा IFR (Instrument Flight Rules) जिथे हाय-टेक उपकरणांच्या साहाय्याने कमी व्हिजिबिलिटीमध्ये (३ किमीपेक्षा कमी) लँडिंग केले जाते.
बारामती विमानतळावर मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांप्रमाणे ‘इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम’ (ILS) उपलब्ध नाही. त्यामुळे धुके किंवा कमी दृश्यमानता असताना तिथे केवळ तांत्रिक उपकरणांच्या भरवशावर उतरणे अशक्य असते. ३ किमी व्हिजिबिलिटी असतानाही पायलटने लँडिंगचा प्रयत्न केला, जो जीवघेणा ठरला.
“बारामतीमध्ये मोठे विमानतळ किंवा हाय-टेक लँडिंग सुविधा नाहीत. अशावेळी ३ किमी व्हिजिबिलिटी ही ‘मार्जिनल’ असते. त्यातच Learjet ४५ हे ‘Approach Category C’ मध्ये येत असल्याने त्याला लँडिंगसाठी अधिक अचूकतेची गरज असते.”
२५ जुलै २०२२ ला झालेल्या एका ट्रेनिंग विमानाच्या अपघाताच्या चौकशी रिपोर्टमध्ये ५ किमी मर्यादेचा उल्लेख आहे. तीन किमी दृष्यमानता असताना विमान उतरविण्याची परवानगी कोणी दिली, असाही प्रश्न आता चौकशीत उपस्थित होत आहे.
विमानात बडा नेता, अधिकारी किंवा उद्योजक असला की वैमानिकांवर त्यांना वेळेत उरविण्याचा दबाव असतो. कारण त्यांची कामे महत्वाची असतात. यामुळे अनेकदा रिस्क घेऊन अशाप्रकारची लँडिंग केली जाण्याची शक्यता असते.
बारामती विमानतळावर हवेची गुणवत्ता, हवामान सांगणारी यंत्रणा नाही. २००-२५० किमी दूर असलेल्या मुंबईच्या हवामान यंत्रणेवरून बारामती विमानतळावरील हवामानाची माहिती घेतली जाते. ही पूर्णपणे अचूक नसते. यामुळे पायलटना मुंबईच्या माहितीवरच अवलंबून रहावे लागते. याबाबतचे वृत्त दैनिक भास्कर आणि फ्री प्रेस जर्नल यांनी दिलेले आहे.