July 9, 2025

पंचशील मित्र मंडळातर्फे तंबाखूमुक्त अभियान; गोगाबाबा टेकडी व विद्यापीठ परिसरात जनजागृती..!

वार्ताहर : अशोक अधाने | दि. ०२ जुलै २०२५

www.themaharashtratoday.com

छ.संभाजीनगर (प्रतिनिधी) – पंचशील मित्र मंडळातर्फे गोगाबाबा टेकडी आणि विद्यापीठ परिसरात आज तंबाखूमुक्त भारताच्या संकल्पनेतून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत प्रा. ईश्वर मोरे व श्री. भास्कर मगरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रमाच्या स्वरूपात तंबाखूविरोधी जनजागृती करण्यात आली.

या प्रसंगी प्राचार्य डॉ. मनोहर वानखेडे यांनी सांगितले की, “तंबाखू सेवन ही आजच्या काळातील सर्वात मोठी आरोग्यविषयक समस्या आहे. भारतात दरवर्षी लाखो लोक कॅन्सरग्रस्त होतात आणि यामध्ये तंबाखू हा प्रमुख कारण ठरतो. त्यामुळे प्रत्येकाने तंबाखूचे सेवन टाळले पाहिजे आणि इतरांनाही प्रेरणा दिली पाहिजे.”

डॉ. पाखरे सर म्हणाले की, “युवकांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेज स्तरावर तंबाखूमुक्त अभियान अधिक प्रभावीपणे राबवले पाहिजे.”

कार्यक्रमात सहभागी सदस्यांनी रस्त्यांवरून फेरी काढून घोषणाबाजी केली. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली व तंबाखू सोडण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

या उपक्रमाला छावणी विभागाचे नगरसेवक मा. किशोर कछवा, एड. जगताप, एड. केदारे, इंजि. मधुकर वाघमारे, अशोक सुरडकर, मगरे गुरुजी, प्रधान साहेब, काकरवाल, संसारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या उद्देशाने करण्यात आले असून अशा उपक्रमातून जनतेमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.