November 16, 2025

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची गदाना गावाला भेट: महसूल व शिक्षण क्षेत्राच्या कामगिरीचे कौतुक

✍️ वार्ताहर: अशोक अधाने
📞 मो. 9623871987

www.themaharashtratoday.com

गदाना (वार्ताहर) – खुलताबाद तालुक्यातील सर्व २५ ग्राम महसूल कार्यालयांचे नूतनीकरण व स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पार पडली आहे. त्यानिमित्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी संतोष गोराड, तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी गदाना ग्राम महसूल कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या दौऱ्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

ग्राम महसूल कार्यालयास भेट व कौतुक

गदाना ग्राम महसूल कार्यालयात जिल्हाधिकारी स्वामी यांनी तलाठी सुनिता मंडपे यांच्या कार्यालयाची पाहणी केली. नूतनीकरण व स्वच्छतेच्या कामावर समाधान व्यक्त करत त्यांनी मंडपे यांचे विशेष कौतुक केले. यावेळी गावच्या सरपंच सविता चव्हाण यांनी जिल्हाधिकारी महोदयांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. उल्लेखनीय म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम महसूल कार्यालयाचे उद्घाटन स्वतः न करता सरपंच सविता चव्हाण व तलाठी सुनिता मंडपे यांच्या हस्ते करून महिलांच्या सशक्तीकरणाला चालना दिली.

या भेटीदरम्यान उपस्थित तहसीलदार स्वरूप कंकाळ, उपविभागीय अधिकारी संतोष गोराड, ग्रामसेवक गंगाधर गायकवाड, उपसरपंच कैलास बडूगे, तसेच प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेला भेट व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, गदाना येथे सहावीच्या वर्गाला भेट दिली. वर्गावर उपस्थित शिक्षिका अर्चना अशोक अधाने यांच्याशी संवाद साधत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रभावी भाषणे सादर केली. यामध्ये सहावीतील विद्यार्थिनी प्राची अंकुश ठेंगडे हिने उत्कृष्ट भाषण सादर केल्याबद्दल जिल्हाधिकारी स्वामी यांनी तिला रोख ₹500 चे बक्षीस देऊन तिचे कौतुक केले. त्यांच्या या प्रेरणादायी प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत

या दौऱ्यादरम्यान उपस्थित मान्यवरांमध्ये तहसीलदार स्वरूप कंकाळ, मंडळ अधिकारी विजय चव्हाण,वरिष्ठ महसूल अधिकारी अनिल भगत, ग्रामसेवक गंगाधर गायकवाड, मुख्याध्यापक नदीम शेख, तलाठी संघटना अध्यक्ष बंडू आव्हाड,ग्रामसुल अधिकारी भडजी रिजवान शेख, उपसरपंच कैलास बडूगे, ग्रामपंचायत सदस्य राजू चव्हाण, काकासाहेब अधाने, जनार्धन वाहुळ, रामहरी तुपे, नागरिक पद्माकर खाडे, ग्रा.शिपाई रावसाहेब चौधरी, युवा प्रशिक्षणार्थी अनिल अधाने, अंकुश चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षक सदावर्ते सर, तायडे सर, जाधव सर, चव्हाण सर, काळे मॅडम, दांडेकर मॅडम आदींचा समावेश होता.

ग्राम महसूल व शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या चांगल्या कार्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा आढावा गावाच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरला. त्यांच्या उपस्थितीमुळे गावातील शासकीय यंत्रणेला सकारात्मक ऊर्जा मिळाली असून ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

✍️ वार्ताहर: अशोक अधाने
📞 मो. 9623871987