“घटस्थापणा,नवरात्र आणि विजयादशमी”
दि.१५ ऑक्टोबर २०२३
घटस्थानेचा सण हा नवनिर्मितीचा उत्सव आहे.हा भूमी आणि माता या दोघींच्या ठायी असलेल्या सर्जनशीलतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे.त्यांच्याकडे असलेल्या या विशेष शक्तीमुळेच प्राचीन काळापासून भूमी आणि माता यांचे साम्य दाखविण्याचे प्रयत्न झाले आहेत.भूमिला माता आणि मातेला भूमी मानण्याची घटना त्याचाच एक भाग होय.शिवाय शेतीचा शोध स्त्रियांनी लावला,असेच या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.त्यामुळे हा उत्सव कृषीसंस्कृतीचे नेमके दर्शन घडवणारा आहे.तसेच,स्त्रियांनी शेतीचा शोध ज्या क्षणी लावला,त्या क्षणाचा दरवर्षी आनंददायक स्मरण करण्याचाही आशय घटस्थापनेमधून व्यक्त होतो.म्हणून आपण घटस्थापनेचा सण हा या दृष्टींनी साजरा करावा.या सणामागचा मुळ हेतू माता आणि भूमी यांच्या नवनिर्मितीचा गौरव करण्याचा असला,तरी आता आपण या आशयाच्या कक्षा अनेक अंगांनी विस्तारायला हव्यात.ही नवनिर्मिति केवळ भूमीशी आणि मातेशी जोडून मर्यादित करण्याऐवजी त्या निर्मितीच्या जोडीने जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये काही ना काही नवीन निर्माण करण्याचा ध्यास बाळगणे आणि तो ध्यास सफल करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचा निश्चय करणे,या दृष्टीने या सणाच्या प्रसंगी योग्य ते उपक्रम कृतीत आणावेत.त्याबरोबरच आजही शेतीच्या आधारे सर्व मानवजातीच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करणार्या शेतकर्यांचा आदरसत्कार करणे आणि मानवजातीच्या अस्तीत्वाचा प्रवाह अखंडीतपणे अस्तित्वात ठेवणार्या स्त्रियांविषयी योग्य तो आदरभाव व्यक्त करणे,या स्वरूपाचे उपक्रमही या काळात आयोजित करावेत.नवरात्र नऊ दिवस साजरी करण्याऐवजी एक,तिन वा पाच दिवस साजरी करण्याचा पर्यायही स्वीकारता येईल.या काळात निर्ऋतीपासून सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत आणि त्यांच्या नंतरच्या काळातील विशेष कार्य करणार्या स्त्रियांपर्यंत आपले प्रेरणास्थान बनलेल्या विविध स्त्रियांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे उपक्रमही आयोजित करावे.
खंडेनवमीला विविध शस्त्रांची,अवजारांची,साधनांची पुजा करण्याची परंपरा आहे.या पुजेला सैधान्तिक आणि व्यावहारिक असे दोन पैलू आहेत.आपण आपले प्रेरणास्थान असलेल्या महान व्यक्तीविषयी कृतज्ञता बाळगतो.आणि ते व्यक्त करणारे सण साजरे करतो.बैल,नाग,वनस्पती वगैरेंचेही उपकार आठवून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.ही बाब मानवी मनाला उन्नत करणारीच आहे.त्याच पद्धतीने निर्जीव असूनही आपल्याला अतिशय उपयोगी ठरणार्या आणि आपले जीवन अधिक सुखमय करणार्या वस्तूंविषयी कृज्ञता व्यक्त करणे,हेही उमदेपणाचेच आहे.अर्थात या पुजेचे स्वरूप नवस,अनिष्ट कर्मकांड वगैरे प्रकारचे असता कामा नये,याची दक्षता मात्र घ्यायला हवी.ही झाली सैधान्तिक बाजू.व्यावहारिक दृष्टीने पाहता आपण जी साधने सातत्याने वापरत असतो ती योग्य अवस्थेत आहेत की नाहीत याची तपासणी करणे,त्यांची स्वच्छता करणे आणि त्यांना गरज पडेल तेव्हा तातडीने वापरता येईल.अशा अवस्थेत सज्ज ठेवणे,हाही या पुजेमागचा उद्देश असतो.तेव्हा त्या दृष्टीने उपक्रमांची आखणी करावी.ही सावधगीरी खंडेनवमीच्या दिवशीच बळगली पाहिजे,असे नाही,तर तो आपल्या नित्य व्यवहाराचा भाग व्हायला हवा.
फार पूर्वीच्या काळापासून विजयादशमी हा सण प्रामुख्याने विजय आणि सीमोल्लंघन या संकल्पनांशी जोडण्यात आला आहे.आपण आधुनिक काळात या संकल्पनांचे जे पूर्वीचे आशय होते,त्यांच्या मर्यादेत अडकून पडण्याचे कारण नाही.या संकल्पनांशी आता आपल्या समाजाला उन्नतीच्या दिशेने घेऊन जाणारे नवे संदर्भ जोडणे गरजेचे आहे.अज्ञान,दारिद्र्य,अनारोग्य,विषमता,शोषण,दैन्य,गुलामगिरी इ.प्रकारच्या,अनिष्ट,विघातक आणि मनुष्यत्वाची हानी करणार्या घटकांवर विजय मिळविने,या अर्थाने आता आपण विजयादशमी साजरी करावी.या अनिष्ट घटकांनीच आपल्या विकासावर मर्यादा घातलेल्या असतात,त्यांच्या भोवती कुंपण घातलेले असते,त्यांना संकुचित सिमेत बांधून टाकलेले असते.आपण आता ही कुंपणे,या मर्यादा ओलांडणारे विविध उपक्रम विजयादशमीच्या वेळी आयोजित करावेत.हेच सीमोल्लंघन होय.आताचा काळ हा कोणावर अतिक्रमण वा आक्रमण करून,हिंसा आणि रक्तपात करून विजय मिळविण्याचा नाही,परंतु वेगवेगळ्या क्षेत्रातून कर्तृत्वाची पल्लेदार झेप घेण्याचा आहे.ज्या क्षेत्रांमध्ये पूर्वी आपल्याला प्रवेश मिळत नव्हता वा आपण ज्या क्षेत्राची उपेक्षा केली होती,त्या क्षेत्रांमध्ये अधिकाधिक उंचीवर जाण्याचा प्रयत्न करणे आणि त्यासाठी विशेषत: तरुण पिढीला प्रोत्साहन देणेे,मार्गदर्शन करणे आणि त्यांना यश मिळाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणे,ही खरी विजयादशमी होय.
।। जय जिजाऊ ।।
सौजन्य – शिवधर्म गाथा
संकलन – रामचंद्र सालेकर
More Stories
नवरात्र उत्सव गिरजा देवी संस्थान म्हैसमाळ येथे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते सुरुवात