प्रतिनिधी : गदाना, ता. खुलताबाद (जि. छत्रपती संभाजीनगर) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी मौजे गदाना येथे ग्रामपंचायतच्या पुढाकाराने विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमात अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. मात्र, या दिवशी गदाना येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (एमएसईबी) पावर हाऊस कार्यालयातील कनिष्ठ अभियंता व इतर प्रमुख अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, याबाबत अधिकृत पंचनामा करून तहसीलदारांना सादर करण्यात आला आहे.
सकाळी 11:00 वाजता गदाना पावर हाऊस कार्यालय येथे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी तसेच अनेक ग्रामस्थ एकत्र जमले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुष्पांजली अर्पण करत जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम नियोजित होता. मात्र, सदर कार्यालयात कनिष्ठ अभियंता व इतर अधिकारी अनुपस्थित आढळून आले. उपस्थित व्यक्तींनी या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त केला.
अशा परिस्थितीत ऑपरेटर अधाने, लाईनमन ठेंगडे व वायरमन पठाण हे तिघेच कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. गावकऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती एस. एन. मंडपे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा तयार करण्यात आला. उपस्थित सर्वांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर सही व अंगठे लावले. यासोबतच ग्रामस्थांकडून जबाब लिहून घेण्यात आला.
ग्रामपंचायत सदस्य श्री. जनार्दन वाहूळ, उपसरपंच श्री. कैलास बडूगे, श्री. प्रकाश चव्हाण व इतर गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सदर कार्यालयात गेले असता केवळ दोन-तीन कर्मचारी वगळता कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते. आम्ही स्वतः अभिवादन करून जयंती साजरी केली. ही बाब आमच्या स्वाभिमानाशी जोडलेली असून, अशा वर्तणुकीचा आम्ही निषेध करतो.”
जबाब देणाऱ्यांमध्ये छबू गोविंदराव वाहूळ, रामहरी तुपे, जनार्दन वाहूळ, कैलास बडूगे, राजू चव्हाण, दत्तू चव्हाण, पोलीस पाटील भगवान वाहूळ, काकासाहेब अधाने यांचा समावेश होता. याशिवाय अनेक गावकऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवून आक्रोश व्यक्त केला.
सदर पंचनामा व जबाबांची सत्यप्रत तहसील कार्यालय खुलताबाद येथे सादर करून योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधानकार, महान विधिज्ञ व समाजसुधारक होते. त्यांची जयंती हा राष्ट्रीय स्वाभिमानाचा दिवस आहे. अशा दिवशी शासकीय अधिकारी अनुपस्थित राहणे ही अत्यंत गंभीर बाब असून याबाबत प्रशासनाने कडक कारवाई करावी.”
More Stories
राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश..! डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता
खुलताबाद तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025-30 साठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर
आरती अधाने यांनी राष्ट्रीय जुडो स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक – ग्रामीण भागातून जागतिक स्तराकडे वाटचाल