November 16, 2025

गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात एकमत उमेदवार निवडीसाठी बैठक; सुरेश सोनवणे व राजू चव्हाण चर्चेत

गदाना : 26 ऑक्टोबर 2024
प्रतिनिधी: अशोक अधाने

www.themaharashtratoday.com

गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात एकत्रितपणे एकच उमेदवार देण्याच्या उद्देशाने मनोज पाटील जरांगे यांच्या आदेशाने खुलताबाद तालुक्यातील काटशेवरीफाटा येथे विविध नेत्यांसह तालुक्यातील विविध कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मराठा समन्वयक राजू चव्हाण,शेतकरी संघटनेचे काशिनाथ वेताळ, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कारभारी जाधव, पं.स. माजी सभापती गणेश अधाने,आबेद जागीदार, शंकरराव अधाने,संतोष लाटे, विलास चव्हाण आणि गरुड झेप अकॅडमीचे प्राध्यापक सुरेश सोनवणे उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सतत सक्रिय असणारे राजू रंगनाथ चव्हाण यांचे नावही या वेळी चर्चेत आले. नागरिकांमध्ये राजू चव्हाण यांना गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी वाढत असतांनाच सुरेश सोनवणे यांनी मराठा, मुस्लिम व ओबीसी समाजाचे मतदान होऊन इतर समाजही मतदान करतील या विश्वासार्ह भूमिकेने मला उमेदवारीसाठीची इच्छा व्यक्त केली आहे. विद्यमान भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण शरद पवार गटातून उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. अशातच सुरेश सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे घोषित केले आहे.

सोनवणे यांनी उमेदवारीसाठी तालुक्यातील लहान कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत भेटीगाठी घेऊन समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली, ज्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये “जरांगे ट्रॅक्टर मुळे मराठा समाजाचे मतदान एकत्र झाल्यास काय चित्र असेल ?” हे बघण्यासारखे असेल अशी चर्चा सुरु होती.