February 9, 2026

खुलताबाद तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक : शेवटच्या क्षणी अर्ज भरण्यासाठी झुंबड, एकूण 95 उमेदवारी अर्ज दाखल

www.themaharashtratoday.com

मोबाईल नं. 9623871987

📅 दिनांक : 22 जानेवारी 2026

 प्रतिनिधी : अशोक अधाने

खुलताबाद : खुलताबाद तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस असल्याने दुपारी तीन वाजेपर्यंत तहसील कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली.
निवडणूक आयोगाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
शेवटच्या 20 मिनिटांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आले.
📊 उमेदवारी अर्जांची एकूण आकडेवारी :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत खुलताबाद तालुक्यातील तीन गट व सहा गणांमधून एकूण 95 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
▪️ जिल्हा परिषद (3 जागा) – 30 अर्ज
▪️ पंचायत समिती (6 जागा) – 65 अर्ज
➡️ एकूण अर्ज – 95
📍 गटनिहाय प्राप्त उमेदवारी अर्ज :
▪️ वेरूळ – 14
▪️ गदाना – 8
▪️ बाजार सावंगी – 8
➡️ एकूण – 30
📍 गणनिहाय प्राप्त उमेदवारी अर्ज :
▪️ वेरूळ – 10
▪️ गल्ले बोरगाव – 12
▪️ गदाना – 10
▪️ ताजनापूर – 07
▪️ बाजार सावंगी – 13
▪️ टाकळी राजाराय – 13
➡️ एकूण – 65
खुलताबाद तालुक्यातील गदाना, वेरूळ, बाजार सावंगी गटातून तसेच वेरूळ, गल्ले बोरगाव, ताजनापूर, गदाना, बाजार सावंगी व टाकळी राजाराय गणातून हे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
⏰ शेवटच्या क्षणी धावपळ :
दुपारी दोन ते अडीच वाजेनंतर अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी प्रचंड वाढली.
ठीक तीन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून तहसील कार्यालयाचा प्रवेश बंद केला.
वेळ अपुरा पडल्याने काही इच्छुक उमेदवारांची मोठी धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आले.
🏢 प्रशासनाची नियोजनबद्ध तयारी :
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण नियोजन करण्यात आले होते.
अर्ज दाखल करताना फक्त उमेदवार व सूचक या दोन जणांनाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात प्रवेश देण्यात येत होता.
यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवून शिस्तबद्ध पद्धतीने अर्ज दाखल प्रक्रिया पार पडली.
या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता शिंदे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार संतोष गुट्टे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेख समीर, नायब तहसीलदार अविनाश निळेकर व अनिल भगत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
🏛️ राजकीय हालचाली :
आमदार प्रशांत बंब यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना एका हॉटेलमध्ये बसवून एबी फॉर्म दिले व स्वतः तहसील कार्यालयात येऊन उमेदवारी अर्ज दाखल केले.
मात्र नेमका एबी फॉर्म कोणत्या उमेदवाराला देण्यात आला, याबाबत दिवसभर चर्चांना उधाण आले होते.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज सतीश शुक्ला, राजू वरकड व अनिल नलावडे यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आले.
तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवारांचे अर्ज तालुका अध्यक्ष सुरेश जाधव, महेश उबाळे, शंकरराव अधाने, दिनेश सावजी व गजानन फुलारे यांच्या उपस्थितीत दाखल झाले.
🚓 पोलीस बंदोबस्त :
तहसील कार्यालय परिसरात पोलीस निरीक्षक धनंजय पराठे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
🔥 आठ वर्षांनंतर निवडणूक, उत्साह शिगेला :
तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमुळे इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
बुधवारपर्यंत एकूण 207 उमेदवारी अर्जांची विक्री झाली होती, त्यापैकी 95 अर्ज प्रत्यक्ष दाखल झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतरच खुलताबाद तालुक्यातील निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.