November 16, 2025

कारगिल विजय दिनानिमित्त वीर जवानांना अभिवादन कार्यक्रम

🖋️ प्रतिनिधी : अशोक अधाने

www.themaharastratoday.com

📍 दिनांक: 25 जुलै 2025

वेरुळ (प्रतिनिधी) – दिनांक २५ जुलै, शुक्रवार रोजी वेरुळ येथील आय.टी.आय. मध्ये ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन कारगिल युद्धातील भारतीय शूरवीर सैनिकांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी, शिक्षक व उपस्थितांनी वीर जवानांच्या पराक्रमाचे शब्दचित्र उभे करत त्यांचे स्मरण केले. “ज्या शूर वीरांच्या बलिदानामुळे आपण आज सुरक्षित आणि सुखी जीवन जगत आहोत, त्यांच्या शौर्याचे स्मरण करणे ही आपली जबाबदारी आहे,” असे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कारगिल विजय दिवस हा भारताच्या लष्करी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. १९९९ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात लडाखमधील कारगिलमध्ये झालेल्या युद्धात भारताने ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत पाकिस्तानच्या घुसखोर सैनिकांना पराभूत केले. सुमारे ६० दिवस चाललेल्या या युद्धाचा समाप्तीचा दिवस २६ जुलै रोजी झाला. त्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस देशभरात साजरा केला जातो.

टायगर हिलसह इतर अनेक महत्त्वाच्या चौक्यांवर पुन्हा ताबा मिळवून भारताने हा ऐतिहासिक विजय संपादन केला होता. या विजयात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो.

कार्यक्रमाचे संयोजन आय.टी.आय. वेरुळच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी केले. देशभक्तिपर गीत, भाषणे आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या कथा यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारले होते.