November 15, 2025

एम.फिल विद्यार्थ्यांना तत्काळ पीएचडी प्रवेश द्यावा..! सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

🖋️ प्रतिनिधी : अशोक अधाने

www.themaharastratoday.com

📍 दिनांक: 28 जुलै 2025

 

छ.संभाजीनगर  (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभाग, अर्थशास्त्र, ग्रंथालय, मराठी, इतिहास, इंग्रजी, कॉमर्स यासह अनेक विद्याशाखेतील एम.फिल पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना राज्य व केंद्र सरकारच्या बार्टी, सारथी, संस्थेमार्फत एम.फिल ते पीएचडी अशी फेलोशिप मंजूर आहे. परंतू विद्यापीठ प्रशासन पीएचडी प्रवेशासाठी संशोधक मार्गदर्शक उपलब्ध करून देत नसल्यामुळे व ज्या विद्यार्थ्यांकडे संशोधक मार्गदर्शक आहेत. त्यांची DRC, RRC होऊन देखील पीएचडी प्रवेश देण्यात येत नसल्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून संशोधक विद्यार्थी पाठपुरावा करत आहेत. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मागण्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची शनिवारी त्यांच्या कार्यालयात संशोधक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विद्यापीठाचे कुलगुरू विजय फुलारी यांना सोमवारी पत्र पाठवले त्यात म्हटले आहे एम.फिल संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी प्रवेशासनाठी मार्गदर्शक उपलब्ध करून देऊन त्रिसदस्यीय समिती DRC, RRC तत्काळ घेऊन पीएचडी प्रवेश नोंदणी पत्र द्यावे. तत्पूर्वी शनिवारी विद्यार्थ्यानी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. तत्कालीन कुलगुरू प्रमोद येवले यांच्या कार्यकाळात १२ जून २०२३ रोजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने काढलेल्या पत्रकानुसार जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विषयातील विद्यार्थ्यांचा पीएच.डी. संशोधन विषय इतर विषयाशी संलग्न असल्यास त्या विषयामध्ये मुख्य मार्गदर्शक निवडण्याकरिता मुभा देण्यात आली होती. तसेच १२ जुलै २०२४ रोजी अधिष्ठाता मंडळाच्या इतिवृतांस कुलगुरू प्रमोद येवले यांनी मान्यता दिली त्या पत्रकातील नियम क्र २. नुसार एम.फिल हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना ज्या विद्यार्थ्यांना भारत सरकार, किंवा राज्य सरकारच्या (बार्टी, सारथी, महाज्योती) संस्थेमार्फत फेलोशिप मिळाली व ती पीएचडी करिता (JRF ते SRF) अशी नियमित आहे. अशा एम. फिल संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशासाठी त्रिसदस्यीय समिती नेमून DRC, RRC मध्ये सर्व प्रकरणे मान्य करून पीएचडी अभ्यासक्रमासाठी Provisional पत्र निर्गमित करून पीएचडी प्रवेश देण्याची शिफारस सर्वानुमते घेण्यात आली होती. यानुसार २०१९- २० व २०२१ या वर्षातील अनेक संशोधक विद्यार्थ्यांचे पीएचडी प्रवेश झाले आहेत. परंतु कुलगुरू प्रमोद येवले यांचा कार्यकाळ संपल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने एम. फिल विद्यार्थ्यांना पीएचडी प्रवेश देण्यास सतत टाळाटाळ केली.दोन वर्ष एम.फिल केलं फेलोशिप मंजूर आहे यानुसार उच्च शिक्षण घेण्याची आमच्याकडे पात्रता असताना देखील विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांना पीएचडी प्रवेशापासून वंचित ठेवत आहे. याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर मानसिक व शारीरिक परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.